Thursday, December 16, 2010

अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध कृतीतून दाखवू - राज ठाकरे

चिपळूण - "कोकणचा विकास करण्यासाठी इतर अनेक पर्याय असताना केवळ अणुऊर्जा प्रकल्पच कोकणच्या माथी का मारले जात आहे ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अणुऊर्जा प्रकल्पांना असलेला विरोध कृतीतून दाखवू'', असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारला दिला.

ते म्हणाले, ""अमेरिकेत 1973 नंतर दोन अणुऊर्जा प्रकल्पांना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मान्यता दिली आहे. पण या प्रकल्पांना अमेरिकेच्या सिनेटने अजून मान्यता दिलेली नाही. चीनमध्ये अणुबॉम्बचा स्फोट झाल्यापासून कायदे कडक करण्यात आले आहेत. एखाद्या प्रदेशात अणु प्रकल्प साकारायचा असेल तर त्याला इंटरनॅशनल लॉ ची परवानगी घ्यावी लागते. लोकसभेत अद्यापपर्यंत तसा प्रस्तावही मांडण्यात आलेला नाही. अणुऊर्जा प्रकल्पांविषयी केंद्र सरकारकडून योग्य माहिती दिली जात नाही. असे असताना जमीन संपादित करण्याचा डाव का रचला जात आहे, महाराष्ट्राचे नेते का गप्पा आहेत.''

महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करण्यासाठी वीज उत्पादनाची मोठी गरज आहे. त्यासाठी एकट्या कोकणमध्ये 21 ऊर्जा प्रकल्प आणणे हा पर्याय असू शकत नाही. कोकणची जमीन सुपीक आहे. शेतीसाठी योग्य असलेल्या या जमिनीत प्रकल्प उभारण्यापेक्षा नापिक जमिनीत अणुऊर्जा प्रकल्प उभारा. अणुऊर्जा प्रकल्पातून कोकणचा कोळसा करण्यापेक्षा येथे येणारे प्रकल्प राज्याच्या विविध भागात विभागून द्या. समुद्रकिनारा नसलेल्या प्रदेशामध्ये प्रकल्प कसे उभे राहिले. डहाणुमध्ये रिलायन्स कंपनीने 100 टक्के प्रदूषण मुक्त वीज प्रकल्प उभारला आहे. त्याची माहिती मी घेतली आहे. अशा प्रकारचे प्रकल्प सरकारने हाती घेतले तर आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करू; मात्र अणुऊर्जा प्रकल्पांना मनसेचा विरोध असेल आणि तो आम्ही कृतीतून दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment