Thursday, December 16, 2010

‘जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे’

अणुऊर्जानिर्मिती हा सर्वाधिक किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त असा पर्याय आहे, तो झालाच पाहिजे. त्याला विरोध करता कामा नये. राष्ट्राच्या हितासाठी असलेल्या या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या काही शास्त्रज्ञांना अणुविषयक माहिती अवगत नाही. त्यांनी लोकांमध्ये गैरसमज पसरवू नयेत, असे परखड मत अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांनी व्यक्त केले. मात्र स्थानिक जनतेच्या अडचणींची समाधानकारक उत्तरे मिळाल्याशिवाय जैतापूर प्रकल्पाचे काम सुरू करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
रत्नागिरीत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन परिषदेच्या कार्यक्रमाला डॉ. गोवारीकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत मांडले. ते पुढे म्हणाले, जैतापूर येथे होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आंदोलने होत आहेत. अनेक संघर्ष समित्या या आंदोलनात उतरल्या असून त्यांना राजकीय पक्षांचाही सक्रिय पाठिंबा मिळत आहे, तर काही शास्त्रज्ञ मंडळीही प्रकल्पाविरोधी लोकांच्या बाजूने उभी असल्याचे दिसून येते. वास्तविक हा प्रकल्प राष्ट्रीय कल्याणासाठी उभारण्यात येणार असून तो ऊर्जानिर्मितीचा एकमेव किफायतशीर, फायदेशीर व प्रदूषणमुक्त असा पर्याय आहे.
या प्रकल्पाला विरोध करणारे शास्त्रज्ञ सबळ असे कोणतेही शास्त्रीय कारण देऊ शकले नाहीत. त्यांना अणू तंत्रज्ञान पूर्णत: अवगतच नाही. अणुविघटन १९ व्या शतकात घडले. तर पहिला प्रकल्प ४० ते ५० च्या दशकात तयार झाला. त्यानंतर पहिला अणुबॉम्ब बनविण्यात आला आणि त्यानंतरच्या गेल्या ६० वर्षांचा इतिहास पाहिला तर या कालावधीत क्वचितच अपघात घडल्याचे दिसून येईल, असे गोवारीकर म्हणाले. त्याचे विश्लेषण करून भविष्यात तो होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. अणुशास्त्रज्ञांच्या अपुऱ्या माहितीमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. हा प्रकल्प राष्ट्राच्या कल्याणासाठी हितकारक असल्यामुळे जैतापूरचा प्रकल्प झालाच पाहिजे. आज अणुऊर्जेशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्याच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान हे अत्याधुनिक व विकसित आहे. त्यामुळे प्रदूषण होईल हे म्हणणे चुकीचे असून त्यापासून कोणताही धोका नसल्याचे डॉ. गोवारीकर यांनी स्पष्ट केले.
भविष्यातील विजेच्या टंचाईवर हा प्रकल्प किफायतशीर आहे. मात्र त्याबद्दल लोकांच्या अडचणी व शंका आहेत. या अडचणी, शंका शास्त्रज्ञ व तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन सोडवल्या पाहिजेत. या चर्चेतून जोपर्यंत समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत प्रकल्प सुरू करू नये, असा सल्लाही डॉ. गोवारीकर यांनी शेवटी दिला.

No comments:

Post a Comment