Thursday, December 9, 2010

जैतापूर प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध


रत्नागिरी, ५ डिसेंबर
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला दिवसेंदिवस धार येत असल्याचे कालच्या उद्रेकावरून समोर आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून प्रकल्पास तीव्र विरोध नोंदविला. हा जनक्षोभ एवढा प्रचंड होता की, पोलिसांच्या एका गाडीचीच संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली, तर लाठीमारासाठी पोलिसांनी लाठी उगारताच दंडुके घेऊन घरातून बाहेर पडलेल्या महिलांचा रुद्रावतार पाहून पोलिसांनी चक्क नरमाईची भूमिका घेतली. भलामोठा फौजफाटा दिमतीला असतानाही प्रकल्पग्रस्तांनी यंत्रणेची तारांबळ उडवून दिली होती.
दरम्यान, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, रायगडच्या वैशाली पाटील, जनहित सेवा समितीचे प्रवीण गवाणकर, कोकण बचाव समितीचे डॉ. विवेक भिडे, मच्छीमार नेते अमजद बोरकर, प्रकाश वाघमारे आदींसह शेकडो आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी एस.टी. बस व पोलीस गाडीवर दगडफेक केली. त्यात गाडय़ांचे नुकसान झाले, तर काही पोलिसांनाही किरकोळ दुखापत झाली.
जैतापूर प्रकल्पाला स्थानिक जनतेचा प्रथमपासूनच तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प होऊ नये म्हणून यापूर्वी मोर्चे, जेलभरो आंदोलन करण्यात आले होते. मात्र केंद्र व राज्य सरकारने हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत उभारायचाच, असा निर्धार केला. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी नुकताच हिरवा कंदील दाखविला आणि ग्रामस्थांनी शनिवारच्या आंदोलनाची हाक दिली. जैतापूर, माडबन, नाटे परिसरातील हजारो ग्रामस्थांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले.
कोळसे-पाटील आले समुद्रमार्गे
नियोजित प्रकल्पस्थळाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांना प्रकल्पस्थळी जाण्यापासून रोखण्यात आले होते. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील हे मागील जेलभरो आंदोलनाच्या वेळी जसे समुद्रमार्गे आले होते, तसेच ते कालच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समुद्रमार्गेच आले. त्यांना पोलिसांनी अटक करताच आंदोलक अधिकच आक्रमक झाले व त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात काही पोलीस जखमी झाले. एका पोलीस गाडीसह एस.टी. गाडय़ांचे नुकसान झाले, तर रायगडच्या वैशाली पाटील या बुरखा घालून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात शेतकरी, बागायतदार यांच्याबरोबरच मच्छीमारही शेकडोंच्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले. आंदोलनात सहभागी होता यावे म्हणून साखरीनाटे परिसरातील सर्व मच्छीमारांनी आपल्या बोटी शनिवारी बंद ठेवल्या होत्या. प्रकल्पग्रस्त स्थानिक ग्रामस्थांच्या भावना सरकारला कळाव्यात, यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. तरीही सरकारने याची दखल घेतली नाही आणि प्रकल्पाचे काम रेटून नेण्याचा प्रयत्न केलाच तर त्या विरोधात आपण प्राण जाईपर्यंत लढा देऊ, असा निर्धार यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अणुऊर्जा प्रकल्प उभारू देणार नाही, असे जनहित सेवा समितीचे गवाणकर व बोरकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.    

No comments:

Post a Comment