Thursday, April 21, 2011

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : पालकमंत्र्यांच्या बैठकांवर ग्रामस्थांचा बहिष्कार

जैतापूर परिसरात लागू असलेली जमावबंदी, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भातील सकारात्मक भूमिका, या पाश्र्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्या मिठगवाणे व नाटे येथील सभांना ग्रामस्थांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. तर नाटे येथील सभेला साखरीनाटे येथील मच्छीमार उपस्थित न राहिल्याने पालकमंत्र्यांना ही सभा अवघ्या १५ मिनिटांतच गुंडाळावी लागली.
दरम्यान पालकमंत्री जाधव यांनी मात्र स्थानिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील. जोरजबरदस्तीने प्रकल्प लादण्याचे काम करणार नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माडबन येथे आणून नागरिकांशी चर्चा घडवून आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पस्थळाला गुरुवारी पालकमंत्री जाधव यांनी भेट दिली. त्यानंतर माडबन, नाटे, मिठगवाणे येथे त्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी मधुकर गायकवाड, जि.पो. अधीक्षक प्रदीप रासकर, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, प्रांताधिकारी अजित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कुमार शेटय़े आदी उपस्थित होते. अणुऊर्जा प्रकल्पस्थळाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या आराखडय़ाची माहिती घेतली. त्यानंतर माडबन येथे आयोजित बैठकीला गेले. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने त्यांचा पहिलाच ‘शो’ फ्लॉप गेला. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट झाले. माडबन येथील बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या ग्रामस्थांच्या कृतीची पुनरावृत्ती अन्य बैठकीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, परंतु मिठगवाणे येथील बैठकीत ग्रामस्थांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावून आपल्या समस्या बेधडकपणे मांडल्या.
या प्रकल्पामुळे आंबा, शेती, मासेमारी व्यवसाय धोक्यात येणार आहे. गरम पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. स्थानिकांना कायद्याचा बडगा दाखवून पोलिसांकडून मारहाण केली जात आहे. यापूर्वी झालेल्या लाठीमारीचा आदेशच झाला नव्हता, असे माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीत पुढे आले आहे. या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे, असे रमाकांत पंगेरकर, भिकाजी कांबळे यांनी बैठकीत सांगितले. यावेळी ग्रामस्थांतर्फे एक निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले असून, त्यात हा अणुऊर्जा प्रकल्प या परिसरातून हद्दपार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा प्रदूषणकारी ठरत असल्याची माहिती माझ्यापर्यंत आली, तर माझ्या स्थानिक बांधवांच्या पाठीशी मीही राष्ट्रवादी पक्षासह पूर्ण ताकदीनिशी उभा राहीन, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली. प्रकल्पासाठी गेलेल्या शेतजमिनींना जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी
आपण सर्व जण सरकारशी चर्चा करू या. जमीन संपादित झालेल्या प्रत्येकाला नोकरी देण्याची हमी देण्यात आली आहे. तसेच त्यांना प्रकल्पामध्ये शेअर्स देण्याचाही निर्णय झाला आहे. मात्र त्याची सविस्तर माहिती माझ्याकडे नाही, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment