Thursday, December 9, 2010

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात "जेल भरो'

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात "जेल भरो'

राजापूर / जैतापूर   -  तालुक्‍यातील माडबन येथील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आज स्थानिकांनी पुकारलेल्या जेल भरो आंदोलनात पंचक्रोशीतील एक हजारांहून अधिक लोक सहभागी झाले. नेत्यांसह सव्वासातशे लोकांना या वेळी अटक करण्यात आली.

सुमारे एक हजार मेगॅवॉट क्षमतेचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तालुक्‍यातील माडबन येथे केंद्र शासनातर्फे उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या घोषणेपासून हा प्रकल्प लोकांच्या तीव्र विरोधामुळे वादात सापडला आहे. विविध आंदोलने, न्यायालयीन लढा अशा विविध मार्गांनी प्रकल्पाला सुरवातीपासून स्थानिकांचा विरोध होत आहे. अशा स्थितीतही प्रकल्पाला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने कामाला सुरवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सेझविरोधी आंदोलनाच्या नेत्या वैशाली पाटील, डाऊ प्रकल्पविरोध आंदोलनात सहभागी झालेले माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांच्यासह अनेकांनी या प्रकल्पविरोधाची धार तीव्र केली. व्यापक आंदोलन उभारून प्रकल्प रद्द करण्यासाठी जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांनी माडबन येथे एका बैठकीत दिला होता.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर माडबन पंचक्रोशीतील लोकांनी आज जेल भरो आंदोलन पुकारले. त्यामुळे सकाळपासूनच वातावरण तंग होते. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे माडबन येथील भगवती मंदिराच्या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. माडबन, मिठगवाणे, साखरीनाटे आदी भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सकाळी नऊपासून भगवती मंदिराच्या परिसरात गोळा झाले होते. भूमिगत झालेले प्रकल्पविरोधी जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर सकाळी अकराच्या सुमारास भगवती मंदिरात आल्यानंतर उपस्थितांनी मंदिरात गर्दी केली. गवाणकर यांनी आंदोलनाची कारणे आणि रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर सुमारे तासभर उपस्थितांनी "ओम श्री भगवते महालक्ष्मी नमो नमः' असा जप करून देवीला साकडे घातले. ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने स्वतःहून जेल भरो आंदोलनात सहभागी होण्याचे जाहीर केले.

या वेळी श्री गवाणकर आणि जनहित सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी अजित पवार, उपविभागीय पोलिस अधीक्षक नरवणे, रत्नागिरीच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याशी प्राथमिक चर्चा करून आंदोलनात ग्रामस्थ सहभागी होत असल्याचे कळविले. ग्रामस्थांना नेण्यासाठी आलेल्या एसटी बसमधून स्वतःहून बसून लोकांनी पोलिसांना सहकार्य केले.

आंदोलनात जनहित सेवा समितीचे शाम नार्वेकर, श्री. मयेकर, आमदार राजन साळवी, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष युयुत्सु आर्ते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विलास अवसरे, अजित नारकर, मंदा वाडेकर, राजा काजवे, डॉ. मिलिंद देसाई, जैतापूरचे शिवसेनेचे शाखाप्रमुख राजन कोंडेकर, मंगेश मांजरेकर, अखिल भारतीय महिला जनवादी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष सुगंधी फ्रान्सिस, प्रमिला माजलकर, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत आदींनी स्वतःला अटक करून घेतली. आंदोलनात शेतकरी, मच्छीमार, महिला-पुरुषांचा सहभाग होता.

गाडगीळ समिती "मॅनेज' - गवाणकर
प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध असून, हा प्रकल्प कोणत्याही स्थितीमध्ये होऊ देणार नाही. नुकतीच कोकण दौऱ्यावर आलेली माधव गाडगीळ समिती "मॅनेज' झाल्याचा आरोप गवाणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ""प्रकल्पाला कोणाचाही विरोध नसून एका व्यक्तीचा विरोध आहे'', असे वक्तव्य महसूलमंत्री नारायण राणे आणि न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशनचे प्रमुख पी. बी. जैन जैन यांनी अलीकडेच केले होते. त्याचा खरपूस समाचार घेताना श्री. गवाणकर म्हणाले की, प्रकल्पाला किती जणांचा विरोध आहे, हे आम्ही आजच्या आंदोलनातून दाखवून दिले आहे.''

एसटी बस अपुऱ्या
आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना नेण्यासाठी केवळ चार एसटी बस ठेवण्यात आल्या होत्या. त्या अपुऱ्या पडल्या. ग्रामस्थांना घेऊन जाणाऱ्या बससमोर महिलांनी प्रकल्पाचा विरोध प्रकट केला. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून प्रांताधिकारी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे पोलिस निरीक्षक जयवंत खाडे आदींनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

हा सरकारी दहशतवाद - पी. बी. सावंत
रत्नागिरी - "जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला विरोध मोडून काढण्याची आजची पद्धत म्हणजे सरकारी दहशतवादच आहे. या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत'', अशी प्रतिक्रिया आंदोलनासाठी रत्नागिरीत दाखल झालेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले. ते म्हणाले, ""सरकारने आमची भीती घेतल्यामुळेच प्रकल्पाच्या ठिकाणापासून आम्हाला आधीच पोलिसांनी रोखले. "इर्मजन्सी' आदेश असल्याचे त्यांचे म्हणणे होते. हा एकप्रकारे जनशक्‍तीला चिरडण्याचाच प्रकार आहे. प्रकल्पाच्या विरोधात "जनशक्‍ती' उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत.''

कोळसे-पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा
जेलभरो आंदोलनात आमदार राजन साळवी यांच्यासह 482 पुरुष, 244 महिला अशा एकूण 726 जणांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. आंदोलनात भाग घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत व सेवानिवृत्त व्हाइस ऍडमिरल श्री. रामदास आले होते. त्यांना हातविले फाटा येथे थांबवून आंदोलनात भाग घेण्यापासून परावृत्त करण्यात आले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जिल्हाबंदी घातली होती. ती झुगारून ते आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे. आंदोलन शांततेत झाले, असे जिल्हा पोलिस दलाकडून देण्यात आलेल्या माहिती पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment