Thursday, December 16, 2010

कोकण किनारपट्टी विध्वंसाच्या दारात

रत्नागिरी - ""किनारपट्टी भागात अणुऊर्जा प्रकल्प उभारून संपूर्ण कोकण नव्हे; तर महाराष्ट्राला विध्वंसाच्या दारात उभे केले आहे'', असे मत पर्यावरणवादी डॉ. विवेक भिडे यांनी व्यक्‍त केले.

ते म्हणाले, ""लोकभावनांचा विचार न करताच या प्रकल्पाला मंजुरी दिली गेली. कोकणच्या पर्यावरणाचा, येथील समृद्ध निसर्गाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. या भागाचा शास्त्रीय अभ्यास केला नाही. अशास्त्रीय पायावर आधारभूत राहून राजकीय लोकांनी त्याला संमती दिली. किनारपट्टी भागात अणुऊर्जा प्रकल्प उभारून संपूर्ण कोकणच नव्हे, तर महाराष्ट्राला विध्वंसाच्या दारात उभे केले. ही एकप्रकारे कोकणी जनतेची फसवणूकच म्हटली पाहिजे. पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनीही आमच्या तोंडाला पाने पुसली. एकीकडे गाडगीळ समिती नेमून पर्यावरण तज्ज्ञांचे लक्ष दुसरीकडे वळविले आणि अचानक प्रकल्पाला मंजुरी दिली. जनसुनावणीत शंभर टक्‍के विरोध असतानाही त्याची दखल घेतली गेली नाही. अमेरिका, युरोप यांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी घाईगडबडीने निर्णय घेतला.''

जयराम रमेश यांच्याकडून आमचा भ्रमनिरास झाला आहे. राष्ट्रीय हिताचा प्रकल्प असल्याचे दाखवून आडमार्गाने प्रकल्प मंजुरी देण्याची कृती शासनाने केली; परंतु, हा प्रयत्न निसर्गच उधळून लावेल; कारण, राजापूर येथील भाग हा भूकंप प्रवणक्षेत्रात येतो. त्याची लवकरच कंपनीला प्रचिती येईल.
ते पुढे म्हणाले, ""1984-85 ला शासनाने जायकवाडी, उज्जैयनी येथे छोटा प्रकल्प उभारण्यासाठी सर्व्हे झाला होता; परंतु, किनारी भागात प्रकल्प उभारून संरक्षणादृष्टीने किती सक्षम आहोत याचा प्रत्यय शासनाने दिला आहे.''

पर्यावरणमंत्र्यांचा निर्णय दुर्दैवी ः ऍड. परुळेकर
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला 100 टक्‍के जनतेने विरोध केला होता. तरीही या प्रकल्पाला परवानगी देण्याचा निर्णय हा दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया ऍड. बाबासाहेब परुळेकर यांनी व्यक्‍त केली. ते म्हणाले, ""लोकशाहीच्या राज्यात जाहीर सुनावणी घेतली. त्यावेळी लोकांनी विरोधही दर्शविला. तसेच सुनावणीत तांत्रिक, शास्त्रीय व राष्ट्रीय संरक्षणाचे प्रश्‍न मांडले. त्याला उत्तरे देता आली नाहीत. हा एकप्रकारे लोकशाहीचा अपमानच आहे''.
कोकण किनारपट्‌टीवर एकच नव्हे तर कोळशावरील आणि ऍटोमिक पॉवरचे अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यांचा एकत्रित होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याची आवश्‍यकता होती. ती मागणी पूर्ण झाली नाही. प्रकल्प फक्‍त लादायचे व त्याचे परिणाम लोकांना भोगायला लावायचे ही दुर्दैवी गोष्ट आहे. या विरोधात स्थानिक जनता आंदोलन तीव्र करेल. तसेच कायदेशीर लढाईही लढतील, त्याला नक्‍कीच आमचा पाठिंबा राहील, असा विश्‍वासही डॉ. परुळेकर यांनी व्यक्‍त केला.

प्रकल्पाला कायम विरोध ः प्रवीण गवाणकर
केंद्र शासनाने प्रकल्पाला हिरवा कंदील दिला असला तरीही आमचा या प्रकल्पाला कायम विरोध राहील. 235 शेतकऱ्यांपैकी 74 शेतकऱ्यांनी प्रकल्पाला दिलेल्या जमिनीचा मोबदला धनादेशाद्वारे स्वीकारला. नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ग्रीन पट्‌टा करतो, असे आश्‍वासन दिले होते; तर जयराम रमेश यांनी किरणोत्सर्ग होत नसल्याचे स्पष्ट केले होते. जर असे असेल तर कोकण हा ग्रीन पट्‌टा कशासाठी करणार आहात. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला कायम विरोध राहील. हा विरोध शांततेच्या मार्गाने दर्शविणार आहोत, अशी प्रतिक्रिया प्रकल्प विरोधक प्रवूण गवाणकर यांनी दिली.
संबंधित बातम्या
चिपळूण, गुहागरला पर्यटकांची पसंती
देवगड किनारपट्टीवर हाय अलर्ट
हातीसला प्रतीक्षा पर्यटनस्थळाच्या मान्यतेची
गणपतीपुळे किनारा पर्यटक, विद्यार्थ्यांनी गजबजला
'थर्टी फर्स्ट' ओसरला; सहलीचा हंगाम फुलला

No comments:

Post a Comment