Thursday, April 21, 2011

जैतापूर प्रकल्प... नाही म्हणजे नाहीच!

* महासभेत उद्धव ठाकरे यांचा निर्धार


* काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका

टीम मटा

' कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही. शिवसेना कोकणवासीयांच्या पाठीशी आहे. हा जनसमुदायच आमची शक्ती आहे. या शक्तीच्या जोरावरच आम्ही कोकणावरचे अणुसंकट परतवून लावू...' असा इशारा देत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथील विराट सभेत जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले.

बहुचर्चित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची महासभा शनिवारी मीठगवाणे येथे आयोजित करण्यात आली होती. या महासभेला कोकणातील शिवसेनेचे सर्वच आमदार-खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सुमारे २५ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. मुस्लिम समाजाची उपस्थितीही लक्षणीय होती. सकाळपासूनच मीठगवाणेकडे येणाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर दुतर्फा गर्दी जमली होती. सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांचे आगमन अपेक्षित होते. मात्र, १० वाजताच उद्धव यांचे हेलिकॉप्टरने मीठगवाणे गावात आगमन झाले. परशुराम उपरकर व राजन साळवी यांनी हापूस आंब्याचा हार घालून उद्धव यांचे व्यासपीठावर स्वागत केले. उद्धव भाषणासाठी उठताच 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयजयकाराने परिसर दुमदुमला. राज्य व केंदात सत्तेवर असलेल्या काँग्रेसवर टीकेची झोड उठवत उद्धव यांनी भाषणाला सुरुवात केली.

' आम्हाला राज्यात दंगाधोपा करायचा नाही. मात्र, आमच्या सहनशीलतेचा अंत झाल्यास त्यापुढची जबाबदारी काँग्रेसची राहील. जुलूम-जबरदस्तीने प्रकल्प जैतापूरवासीयांवर लादू नका. अन्यथा परत येईन त्यावेळी तमाम महाराष्ट्र गोळा केल्याशिवाय राहणार नाही' अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारला ठणकावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार व रत्नागिरीचे प्रांताधिकारी यांना सज्जड इशारा देताना, अणुऊर्जा प्रकल्प जैतापुरात होऊ देणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रकल्पाला एकवटून विरोध करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित जनसमुदायाकडून घेतले. उद्योगमंत्री नारायण राणे यांनाही त्यांनी भाषणात टोले हाणले. माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनीही नारायण राणेंवर खरपूस टीका केली.

यावेळी लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, आमदार दत्ताजी नलावडे, आमदार सुभाष देसाई, रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख राजेंद महाडिक, नीलम गोऱ्हे, जि. प. अध्यक्षा रचना महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. सुभाष देसाई यांनी संपादित केलेल्या 'जपान ते जैतापूर' या पुस्तिकेचेही प्रकाशन यावेळी झाले.

'जैतापूर' नाही म्हणजे नाही - उद्धव

कोकणच्या परशुरामाच्या भूमीत नामर्द जन्माला आलेले नाहीत, असे बजावतानाच जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प जबरदस्तीने राबवणा-यांचे दात घशात घाला, असे आवाहन शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जैतापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत केले. सामान्य जनतेच्या संसाराची राखरांगोळी करणारा जैतापूर प्रकल्प हद्दपार करण्यासाठी शिवसेना सर्व शक्तिनिशी आपल्या पाठीशी उभी आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिली.
जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध जाहीर केल्यानंतर शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच जैतापूर येथे जाऊन स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकले. शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, व्यावसायिक तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मीठगव्हाणेच्या विस्तीर्ण पठारावर झालेल्या जाहीर सभेत जैतापूर प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार यांच्यासह रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मुंबईच्या शाखाशाखांतून आलेले शिवसैनिक आजच्या सभेला उपस्थित होते.
जपानमध्ये झालेल्या भूकंप व त्सुनामीनंतर तेथील अणूऊर्जा प्रकल्पामध्ये किरणोत्सर्ग झाला. त्यामुळे मोठी हानी झाली असून, तसेच प्रयोग निसर्गरम्य कोकणातील जैतापूरच्या गावक-यांवर करू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला केले. कोणतीही लाच, लालूच, कंत्राटाची आमिषे यांना बळी न पडता संसाराची राखरांगोळी करणा-या जैतापूर प्रकल्पाला आम्ही विरोध करणारच, असे आश्वासन त्यांनी स्थानिक जनतेकडून घेतले. स्थानिक जनतेनेही दोन्ही हात उंचावून उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. तोच धागा पकडून उद्धव पुढे म्हणाले की, जबरदस्तीने आणि अन्याय, अत्याचार करून प्रकल्प राबवणा-या काँग्रेसवाल्यांना आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मी बजावू इच्छितो. तुमची निशाणी असलेला हात आणि सामान्य माणसाचे हात यातला फरक समजायचा असेल तर इथे या. सरकार उलथवून टाकण्याची ताकद सामान्य माणसाच्या हातात आहे. सामान्य जनतेने हात उगारला तर काँग्रेसवाल्यांचे आहेत तेवढे दात घशात गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
जैतापूर येथील शिवसेनेच्या या सभेसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेशी काळजी घेण्यात आली होती. राजापूरचे आमदार राजन साळवी , परशुराम उपरकर , कोकणातील शिवसेनेचे सर्व आमदार , रामदास कदम, सुभाष देसाई , दत्ताजी नलावडे , मनोहर जोशी आदी नेतेमंडळीही यावेळी उपस्थित होती.

जैतापूर अणुप्रकल्प अधिक भक्कम!

जैतापूरच्या अणुप्रकल्पाचा परिसर भूकंपाच्या दृष्टिकोनातून मध्यम तीव्रतेच्या भागामध्ये येत असला, तरी या प्रकल्पाची उभारणी करताना अपेक्षेपेक्षा अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करू शकेल, याचा विचार करण्यात येणार आहे.

मुंबई- जैतापूरच्या अणुप्रकल्पाचा परिसर भूकंपाच्या दृष्टिकोनातून मध्यम तीव्रतेच्या भागामध्ये येत असला, तरी या प्रकल्पाची उभारणी करताना अपेक्षेपेक्षा अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करू शकेल, याचा विचार करण्यात येणार आहे. जपानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातून मिळणा-या माहितीचाही या प्रकल्पाच्या उभारणी वेळी विचार करण्यात येणार आहे. तसेच अणुप्रकल्पासारख्या मोठय़ा प्रकल्पांची उभारणी करताना नैसर्गिक संकटांच्या अपेक्षेपेक्षा थोडय़ा अधिक तीव्रतेच्या संकटाला तोंड देता येईल, अशा पद्धतीने बांधकाम केलेले असते याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) प्रकल्पाच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती अणुऊर्जा महामंडळाला (एनपीसीआयएल) दिली. त्यामध्ये हा प्रकल्प ‘सिस्मिक झोन-3’मध्ये मोडतो. मात्र प्रकल्पाची उभारणी करताना ‘सिस्मिक झोन-4’प्रमाणे (भूकंपाचा अधिक धोका असणारे क्षेत्र) बांधणी करण्याचा सल्ला दिला आहे. तो सल्ला ग्राह्य मानून, या प्रकल्पाचे बांधकाम अधिक भक्कम करणार असल्याचे ‘एनपीसीआयएल’चे सरव्यवस्थापक (जनसंपर्क) रणजित काकडे यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले. हा प्रकल्प असणारे क्षेत्र समुद्र सपाटीपासून 24 मीटर उंचीवर आहे, त्यामुळे सुनामीचाही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार असून, कोणत्याही नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी हा प्रकल्प सक्षम असेल. जपानच्या भूकंप आणि सुनामीच्या संकटाची माहिती घेण्यात येत असून, यातून मिळणा-या माहितीच्या आधारे आवश्यकता भासल्यास सुरक्षेचे अधिक उपाय योजण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
अणुप्रकल्पाची उभारणी करताना भूकंप, अतिवृष्टी, वीज पडणे, चक्रीवादळ, रसायनांचा स्फोट, वीज आणि पाणीकपात यांसारख्या बाह्य आव्हानांचा विचार केलेला असतो. या संकटांच्या तीव्रतेपेक्षा एक एकक अधिक तीव्रतेच्या संकटालाही तोंड देता येईल, असे बांधकाम करण्यात येते, असे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांनी सांगितले. भोजे यांनी कल्पकम येथील अणुप्रकल्पाची उभारणी करताना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भूकंपाचा विचार करताना शंभर वर्षामध्ये झालेल्या भूकंपांची तीव्रता आणि तज्ज्ञांचा सल्ला या बाबी विचारात घेतल्या जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले. जपानमध्ये झालेला भूकंप अभूतपूर्व होता, त्यामुळे अधिक भीषण परिस्थिती ओढवली आहे. मात्र प्रत्यक्ष भूकंप आणि सुनामीमुळे झालेली हानी अधिक असताना, संभाव्य अणुसंकटावरच अधिक चर्चा होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पाणीपुरवठा आणि अवजड उपकरणांमुळे प्रकल्प किना-यांवर
जगातील बहुतेक अणुप्रकल्प समुद्रकिना-यांवर आहेत, त्याकडे नेहमीच लक्ष वेधण्यात येत असते. मात्र अणुप्रकल्पातील वीजनिर्मिती आणि शीतक (कुलंट) म्हणून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक असते. तसेच या प्रकल्पांसाठी परदेशातून उपकरणे आयात करावी लागतात. या उपकरणांचे वजन टनामध्ये असते, त्यामुळे त्यांची रस्त्यांवरून वाहतूक करणे सोयीस्कर ठरत नाही. त्यामुळे बहुतेक प्रकल्प किना-यांवर असतात, असे शिवराम भोजे यांनी सांगितले.

जैतापूर प्रकल्पविरोधी हिंसक आंदोलनानंतर रत्नागिरी बंद

प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर मंगळवारी रत्नागिरीत बंद पाळण्यात आला आहे.

रत्नागिरी-प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर मंगळवारी रत्नागिरीत बंद पाळण्यात आला आहे.सर्व प्रकारची वाहतूक थांबवण्यात आली आहे.एसटी बसेस अडवल्या गेल्या व त्यातील प्रवाशांना खाली उतरवून बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई-कोल्हापूर महामार्गावर शिवसेनेने टायर जाळून रस्ता-रोको केले आहे.अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी थेट पोलिस ठाण्यावर चाल करुन तेथे जाळपोळ केली आणि पोलिसांवर हल्ला चढवला. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तबरेज सायेकर या तरुणाचा मृत्यू झाला होता.सायेकर याच्या मृतदेहाचे अद्याप शवविच्छेदन करण्यात आलेले नाही.यासाठी पाच डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जैतापूर प्रकल्पाच्या विरोधकांकडून सत्याचा बळी

अणुऊर्जेला पर्याय आहे, असे सांगणारे लोक सौर, वायू, लाटा व शेवटी कद्रेंकर समितीच्या शिफारशींप्रमाणे जलविद्युत प्रकल्प असले पर्याय सुचवतात. मुळात चिरंतन म्हणून गौरवलेली सौरऊर्जा रोज फक्त आठ तासच प्रखर उष्णता देते. त्याच वेळी अधिक वीजनिर्मिती होऊ शकते, सौरऊर्जेलाही जमीन लागते. किंबहुना 10,000 मेगावॉट विजेला जैतापूरच्या ९३८ हेक्टर जागेपेक्षा अधिक जमीन लागेल एवढेच नव्हे तर ती वीज 10 पट महाग आहे. हा पर्याय म्हणून व्यवहार्य नाही याकडे दुर्लक्ष करता येत नाही. हिमालय परिसराशिवाय मोठे जलविद्युत प्रकल्प उभारणे भारतात फारसे शक्य नाही. तिथेही पर्यावरण व अन्य विस्थापनाच्या समस्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात 25 टक्के शेतजमीन, 60 टक्के कातळ तर 15 टक्के डोंगरउताराची असे ढोबळ चित्र आहे. म्हणूनच शेतीउत्पन्नात पूर्वीपासून हा जिल्हा कधीच स्वयंपूर्ण नव्हता व आजही नाही. जैतापूर प्रकल्पासाठी 938 हेक्टर जमीन अधिग्रहित झाल्यावर प्रकल्प विरोधकांनी या विभागाचा तीन पिके देणारी जमीन म्हणून उल्लेख केला. प्रत्यक्षात खाडीच्या खारजमिनीत होणारी कुळीथ, वाल उडीद इ. उत्तम भातशेतीच्या जमिनीतला तांदूळ व वरकस जमिनीतले नाचणी, वरी अशा पिकांचे उत्पन्न गेल्या कित्येक वर्षात वाढलेले नाही. हे सर्व उत्पन्न जिल्ह्यातील जनतेला सरासरी चार महिनेही पुरत नाही.

डोंगरउतारावर आंबा, काजू लागवडीला गेल्या वीस वर्षात जोरात सुरुवात झाली. पूर्वीच्या शंभर वर्षात झाली नाही त्याहून कित्येक पटीने लागवड वाढली. कातळात देवगड तालुक्यात जशा आंब्याच्या बागा गेल्या 50 वर्षात बहरल्या तशी सुरुवात आत्ता रत्नागिरीत झाली आहे. माझ्या कुटुंबाची 150 आंबा, 100 नारळ, 100 काजू अशी वृक्षसंपदा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आजही प्रचंड क्षेत्र पडीक आहे. म्हणूनच 938 हेक्टर प्रकल्प जमिनीपैकी 64 टक्के संपूर्णपणे पडीक अशी कातळ जमीन आहे. 28 टक्के वरकस जमिनीत नक्की किती उत्पन्न येते, हा संशोधनाचा विषय आहे. उत्तम भातपीक येणारी काही जमीनही पडीक राहते हेच वास्तव असताना विरोधक मात्र तीन पिके येतात, असा खोटा प्रचार करतात.
‘कोकण जळतासा’ या पुस्तकाच्या लेखकाने माडबनच्या अप्रतिम सौंदर्याने भारावल्यामुळे असेल ‘प्रत्येकाला चांगले वर्षभर कुटुंबाला पुरेल इतक खंडी-दीडखंडी भात पिकते’ असे म्हटले आहे. लेखकाला खंडी म्हणजे 960 किलो हे प्रमाण ठाऊक असते तर लेखक असा भरकटला नसता. प्रत्यक्षात माडबन, वरीलवाडा, मिठगवाणे, निवेली, करेल या गावात (जमिनी अधिगृहीत झालेली गावे) 784 रेशनकार्डे असून त्यापैकी 53 टक्के रेशन कार्डे दारिद्रय़रेषेखालील आहेत व दरमहा रेशन दुकानातल्या अनुदानित अन्नावर लोक जगतात म्हणूनच या पाच गावांत दर महिन्याला तांदूळ 12,130 किलो व गहू 5955 असे एकूण 18075 किलो धान्य खपते. तीन पिकांबद्दलच्या थापेबाजीबद्दल, वर्षभर पुरणा-या भाताबद्दल ऐवढे पुरेसे आहे. अर्थात, पर्यावरण चळवळीत महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्यांनी स्वत:वर पर्यावरणवादी तज्ज्ञ म्हणून शिक्के मारले म्हणजे त्यांना पर्यावरणाची खरीखुरी चिंता आहे असे सिद्ध होत नाही. यापैकी ब-याच जणांना या विषयाचे ज्ञान तर नाहीच. पक्षांमधला कावळा व वृक्षांमधला वटवृक्ष ओळखता येतो, या ज्ञानावर पर्यावरण तज्ज्ञ म्हणता येते असे दिसते.

माडबन परिसरात तुळसुंदे नावाची एक वाडी आहे. मच्छीमार बांधवांची पूर्वी स्वत:ची गलबतेही होती. लेखक या गावातली माहिती देताना म्हणतो, ‘‘गेल्या 10 वर्षात मासळीचे उत्पादन 34 टनांवरून 1020 टनांवर गेले’ म्हणजे 30 पटीने वाढले. याला कोणताही पुरावा दिलेला नाही. एकेकाला दीड खंडी भात येतो म्हणून ठोकून देणारा लेखक मत्स्य उत्पादनात तेच करतो आहे. या गणिताने तुळसुंदे येथे प्रतिवर्षी 10 लक्ष किलो मासे पकडले जातात. त्याची भाजीच्या रु. 40 किलो दराने चार कोटी रु. किंमत होते. पण मग गावातला बर्फाचा कारखाना बंद झाला त्याचे कारण काय? अमेरिकेला सरकार विकले गेले, असा राजकीय ग्रह केल्याने वस्तुस्थिती बदलत नाही. म्हणूनच माडबनच्या उघडय़ासडय़ावर मासे सुकवले जातात, असा जावईशोध ही या शोधपत्रिकारिता करणा-या पत्रकारांनी लावली आहे. असाच एक अत्यंत हास्यास्पद प्रकार भूकंपप्रवण क्षेत्राबद्दल चालू आहे. सव्‍‌र्हे ऑफ इंडिया व सेस्मीक मॅपप्रमाणे जैतापूर परिसर भूकंप प्रवणतेनुसार तिस-या झोनमध्ये येतो, हे स्पष्ट दाखवलेले आहे. नीरिच्या अहवालातही तसे स्पष्ट नमूद केलेले आहे. तरीही प्रकल्प विरोधक हा परिसर झोन चामध्ये येतो व ही माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात मिळाली असे ठोकून देतात. मूळ कागद कुणालाही न दाखवता खोटा प्रचार सुरूच असतो. राजापूर तालुक्यात शिवने नावाची दोन गावे आहेत. 2009 साली दोन ऑक्टोबरला शिवने गावात ढगफुटी झाली व दुस-या दिवशी या गावात भूस्तर खचण्याचा अघटित प्रकार घडला. राजापूरहून लांजे गावात जाताना वाटेत हे गाव लागते. ते प्रकल्पस्थळापासून सुमारे 50 कि. मी. दूर असताना जैतापूरपासून 12 कि.मी. दुस-या शिवने गावात हा प्रकार घडला, असे पुस्तकात दडपून दिले गेले.

कोयना हे जैतापूरपासून 90 कि. मी. दूर असून तेथील भूकंप नोंदणीचे आकडे जैतापूरचे असल्याचे भासवले जाते. गुगल महाजालावर तर चक्क जैतापूरला 93 साली भूकंप होऊन होऊन 9000 माणसे मृत्युमुखी पडल्याचे वाचायला मिळते. दुर्दैवाने असत्याची ही लागण चक्क टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस या नामवंत संस्थेपर्यंत पसरली. तीन डिसेंबर 2010ला डॉ. विवेक मोटेरिओ या शास्त्रज्ञाने जैतापूर अणुवीज प्रकल्पाची ‘तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता आणि पर्यावरणीय सुरक्षितता’ तपासून पाहण्यासाठी शास्त्रीय परिषद भरवली होती. त्याला मी निमंत्रित म्हणून उपस्थित होतो. त्यावेळी फिनलंडहून ‘ग्रीन पीस’ प्रचारक अर्थतज्ज्ञ सहभागी झाले होते. आपल्या सादरीकरणात त्यांनी जैतापूरला पूल बांधताना भूकंप झाला म्हणून थाप मारली. मी त्याला लगेच हटकले. ‘कोणत्या दिवशी हा भूकंप झाला व त्याचा शास्त्रीय पुरावा द्या.’ त्यानंतर त्यांच्या संगणकात त्यांना कोणतीही नोंद न मिळाल्याने त्यांनी चक्क ‘सॉरी’ म्हटले. मी त्यांना खोदून विचारले की ‘हे तुम्हाला समजले कसे?’ त्यावर हे अर्थतज्ज्ञ, पर्यावरणवादी म्हणाले, मला ही माहिती गाववाल्यांनी दिली. यानंतर शास्त्रीय परिषदेत निमंत्रित अवाक् झाले. बरेच पर्यावरणवादी असेच भंपक आहेत.
जैतापूर परिसरात तुळसुंदे व खाडीच्या दुस-या किनाऱ्यावर साखरी नाटे या गावात मच्छीमारी व्यवसाय चालतो. त्यांना चिथावण्याचा व भयभीत करण्याचा दुष्ट प्रयत्न सुरू आहे. अणुभट्टीतून उकळते पाणी समुद्रात सोडले जाईल त्यामुळे संपूर्ण सागरी जीवन नष्ट होईल, असे मंडळी बोलतात इतकेच नव्हे तर पत्रकार कोणताही पुरावा न तपासता त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध करतात. शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून हे कोमट पाणी समुद्रतापमानापेक्षा ५ अंश अधिक असेल असे निश्चित झाले आहे. त्यामुळे मासे मरत नाहीत. प्रत्यक्षात समुद्राच्या जेमतेम पाव चौ. कि. मी. क्षेत्रापुरता त्याचा प्रभाव राहील असे सामुद्री वैज्ञानिक सांगत असताना स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर पाण्याचे तापमान 15 अंश सेंटिग्रेडने वाढेल असे कोणत्या आधारावर सांगतात? कोकणात कोळसाधारित अनेक वीज प्रकल्प प्रस्तावित आहेत. कोळशावरचे प्रकल्प पर्यावरणाची हानी करतात, फलोद्यानाला हे वायू पोषक नाहीत तसेच हवाही प्रदूषित झाल्याने आरोग्यास धोकादायक ठरतात. केवळ वाहतूकखर्च कमी म्हणूनच ते कोकणात व्हावेत हा न्याय नव्हे. माझी सूचना अशी की, महाराष्ट्रात नांदेड, सातारा, बारामती, सांगली, लातूर असे अनेक जिल्हे आहेत. तिथे कोळशाचे वीज प्रकल्प व्हायला काय हरकत आहे? धरण एका जिल्ह्यात सिंचन दुस-याच जिल्ह्यात असे प्रकार महाराष्ट्रात पाहायला मिळतात. वरील जिल्ह्यात असे प्रकल्प झाले की कोकणाला सापत्न भावने वागवले जाते हा आरोपही दूर होईल. अणुऊर्जेला पर्याय आहे, असे सांगणारे लोक सौर, वायू, लाटा व शेवटी कद्रेंकर समितीच्या शिफारशींप्रमाणे जलविद्युत प्रकल्प असले पर्याय सुचवतात. मुळात चिरंतन म्हणून गौरवलेली सौरऊर्जा फक्त आठ तासच प्रखर उष्णता देते. त्याच वेळी अधिक वीजनिर्मिती होऊ शकते, सौरऊर्जेलाही जमीन लागते. किंबहुना 10 हजार मेगावॉट विजेला जैतापूरच्या 938 हेक्टर जागेपेक्षा अधिक जमीन लागेल एवढेच नव्हे तर ती वीज 10 पट महाग आहे. हा पर्याय म्हणून व्यवहार्य नाही याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

जैतापूर पेटले

जैतापूर, दि. १९ : शिवसेनेने पुकारलेल्या रत्नागिरी ‘बंद’च्या निमित्ताने सुरू असलेली दगडङ्गेक, वाहतूकबंदी, व्यवहार ठप्प अशा पार्श्‍वभूमीवर कलम १४४ अनुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. फ्रान्समधील ‘डाऊ’ कंपनीच्या सहकार्याने जैतापूर येथे होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील तबरेज सेजकर नामक आंदोलकाचा सोमवारी मत्यू झाल्यावर आज शिवसेनेने रत्नागिरी शहरात ‘राडा’ सुरू केला आहे. दरम्यान, न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली.
रत्नागिरी ‘बंद’च्या समर्थनासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. शहरात अनेक बसेसच्या काचा ङ्गोडण्यात आल्या. रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर टायर पेटवण्यात आले. शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केली आहे.
संतापलेल्या आंदोलकांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही ‘राडा’ करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पोलिसांच्या गोळीबारात तबरेज या आंदोलकाचा मृत्यू झाला होता. मात्र आंदोलकांनी आज रुग्णालयात गोंधळ घालून त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ दिले नाही. तरबेज याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आंदोलकांनी काही मागण्या केल्या आहेत त्यात शवविच्छेदनाचे व्हिडीओ शूटिंग व्हावे, याप्रसंगी मानवाधिकार संघटनेचा प्रतिनिधी हजर रहावा, तबरेज याच्यावर एकच गोळी झाडली गेली तर आता त्या दोन कशा सांगितल्या जात आहेत, याचे स्पष्टीकरण केले जावे, गोळीबाराचे आदेश देणारे प्रांताधिकारी अजित पवार यांना निलंबित करा यांचा समावेश आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा परिसर बंद करण्यात आला आहे.
दंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी होणार
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍या मच्छिमारांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची दंडाधिकार्‍यांमार्ङ्गत चौकशी करण्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते का, याचीही चौकशी केली जाईल असे गृहमंत्री म्हणाले.
जैतापूरमध्ये संतप्त मच्छिमारांनी साखरीनाटे गावातील पोलिस ठाण्यावर काल हल्ला केला. गावकर्‍यांनी पोलिस चौकी पेटवून दिली, तसेच कागदपत्रांची नासधूस केली. तेव्हा आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात तबरेज सेजकर या मच्छिमाराचा मृत्यू झाला. त्यामुळे जैतापूरमधील संघर्ष आणखीच चिघळला आहे.
अपेक्षेप्रमाणे जैतापूर गोळीबार प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळातही उमटले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.
जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलनात शिवसेनेने जोरदार भाग घेतला आहे. तबरेजच्या बलिदानाची किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशारा देतानाच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन घरी जावे, असे जळजळीत वक्तव्य शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

जैतापूर पेटले; गोळीबारात एक ठार

राजापूर - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात काल आंदोलनाचा भडका उडाला. शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन छेडून प्रकल्पस्थळी शेकडोंच्या संख्येने घुसखोरी करत दगडफेक केली. त्यामध्ये पोलिस उपअधीक्षकांसह (गृह) पाच पोलिस जखमी झाले. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. संतप्त आंदोलकांनी नाटे येथे पोलिस ठाण्याची इमारत आणि एक व्हॅन जाळली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला. तबरेज अब्दुल्ला सेहकर असे त्याचे नाव आहे. अन्य चौघे गंभीर जखमी झाले. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह ४५ जणांना पोलिसांनी अटक केली.

माडबन येथे प्रकल्पाच्या कुंपणाची भिंत उभारण्याचे काम सुरू होते. ते बंद पाडण्यासाठी शिवसेनेने सकाळपासून आंदोलन पुकारले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मिठगवाणे येथील सभेत केली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी प्रकल्प होणारच असल्याचे निक्षून सांगितले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संतप्त झाले. माडबन येथे प्रकल्पाच्या नियोजित स्थळावर कुंपण व इतर बांधकामाची कामे सुरू केल्याने आंदोलक व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने प्रकल्पस्थळी चालून आले. साखरीनाटे येथील लोकही समुद्रमार्गे धानिवरेमार्गे प्रकल्पस्थळी गेले होते. पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्‍चक्री झाली. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे आंदोलक पळाले आणि समुद्रमार्गे होडीतून पुन्हा साखरीनाटेकडे गेले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला चढविला आणि मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात पोलिस उपअधीक्षक (गृह) संजीव मोरे यांच्यासह चार पोलिस जखमी झाले. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. नाटे परिसरातील संतप्त आंदोलकांनी थेट पोलिस ठाण्यावरच हल्ला केला आणि कार्यालय जाळून टाकले. जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये तेरा जण जखमी झाले. जखमी झालेल्या तबरेज अब्दुला सेहकर (२३) याचा मृत्यू झाला.



रत्नागिरीतही जोरदार उद्रेक
रत्नागिरी - जैतापूरमधील आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकाचा मृतदेह पोलिस जीपमधून गोणपाटात गुंडाळून आणण्यात आल्याने आणि पोलिस मृतदेहावर पाय ठेवून बसल्याचे दिसल्याने रत्नागिरी शहरात उद्रेक झाला. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर जादा पोलिस कुमक मागवून जमावावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले. या सर्व प्रक्रियेमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना मोठा पाठिंबा दिला. आज दिवसभरात झालेल्या घडामोडींनंतर शिवसेनेने आज (ता. १९) "जिल्हा बंद'ची घोषणा केली आहे.