Thursday, December 9, 2010

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आता १७ मार्चला रत्नागिरीत भव्य मोर्चा



कोकणात येऊ घातलेल्या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी येत्या १७ मार्चला जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा प्रकल्पविरोधी समिती व डाव्या लोकशाही समितीने केली आहे.
कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समिती आणि रिपब्लिकन डावी लोकशाही समिती यांच्या वतीने या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. रिडालोसचे अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले हे यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले असता त्यांनी जैतापूर- माडबन (ता. राजापूर) येथील प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन चर्चा केली होती.
 त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात २५ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र कोकणातील शिमगोत्सव आदी काही कारणांमुळे ‘तो’ नियोजित मोर्चा लांबणीवर ढकलण्यात आला होता. आता हा मोर्चा बुधवार, १७ मार्चला काढण्यात येणार असून त्यासाठी रिडालोसचे नेते रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.
हा मोर्चा अतिविराट असणार आहे. यात कोकणातील अणुऊर्जाविरोधी जनतेने मोठय़ा संख्येने सामील व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
भाजपचे महागाईविरोधात शनिवारी धरणे आंदोलन
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवार, १३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महागाई विरोधात धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या व प्रदेश चिटणीस माजी आमदार बाळ माने उपस्थित राहणार आहेत.गेल्या काही महिन्यात महागाईने देशभर थैमान घातले असून केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारकडे महागाई नियंत्रणात आणू शकणारे ठोस असे धोरणच नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या असून सर्वसामान्य माणसाचे जीवन असह्य झाले आहे. या विरोधात उठाव करण्याची नितांत गरज असून अशा भ्रष्ट व निष्क्रिय सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
जयस्तंभ, रत्नागिरी येथे आयोजित धरणे आंदोलनाला जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. नाना शिंदे व तालुकाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे.       

    No comments:

    Post a Comment