Thursday, December 9, 2010

जैतापूर आंदोलन नेत्यांना जामीन


म. टा. वृत्तसेवा ठ्ठ रत्नागिरी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनाचे नेते माजी न्या. बी. जी. कोळसे- पाटील आणि वैशाली पाटील यांना जिल्हा कोर्टाने बुधवारी नियमित जामीन मंजूर केला. अन्य १२ आंदोलकांना अटकपूर्व जामीन मिळाला. दरम्यान, रक्ताचा शेवटचा थेंब आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रकल्पाला विरोध करणार असून माघार घेणार नसल्याचा इशारा न्या. कोळसे-पाटील यांनी सुटकेनंतर दिला.

चार डिसेंबरला प्रकल्पाविरोधी जनआंदोलनादरम्यान पोलिसांनी शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले होते. जिल्हा बंदी घातलेले न्या. कोळसे- पाटील आणि वैशाली पाटील यांना घटनास्थळी येताच अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यांच्याशिवाय, संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर, डॉ. विवेक भिडे, मच्छिमार नेते अमजद बोरकर, आदम मुजावर आदी एकूण १२ जणांना अटकपूर्व जामीन मिळाला. अॅड. बाबा परूळेकर, खानविलकर, मच्छिंद आंब्रे, कल्पेश मयेकर आदी वकिलांनी आंदोलकांची बाजू मांडली.

पोलिसांनी सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप कोळसे- पाटील यांनी केला. तीन महिने जैतापूरमध्ये पोलिसांनी एकही सभा घेऊ दिली नाही. न्या. पी.बी. सावंत, अॅडमिरल रामदास व आपल्याला प्रवेशास मज्जाव केला. स्थानिक नेते, मंत्री आणि कंपनीचे दलाल यांना भीती वाटते आहे. त्यांना दडपशाहीने अणुप्रकल्प उभारावयाचा आहे. अणुऊर्जा म्हणजे देशाचा विनाश, कोकणचा विनाश असे आमचे मत असून एन्रॉनलाही आपण विरोध केला होता. या प्रकल्पाने कबूल केलेली २१५० मेगावॉट वीज राज्याला कधीच मिळाली नाही, असे सांगतानाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव आखल्याचा आरोप त्यांनी केला.

अण्णा हजारेंनी 'गांधी' वाचावेत

समाजसेवक अण्णा हजारे यांनी जैतापूर प्रकल्पाला पाठिंबा व्यक्त केल्याप्रकरणी कोळसे-पाटील यांनी अण्णा हजारेंवरही टीका केली. महात्मा गांधी यांचे 'हिंद स्वराज्य' हे पुस्तक अण्णांनी वाचले असते, तर त्यांनी अशी विधाने केली नसती. त्यांनी जपून शब्द वापरले पाहिजेत, असे ते म्हणाले. दरम्यान, हजारे यांच्या भूमिकेमुळे आंदोलकांमध्ये चलबिचल उडाली आहे.
Ref : Maharastra times 

No comments:

Post a Comment