Thursday, April 21, 2011

'जैतापूर' नाही म्हणजे नाही - उद्धव

कोकणच्या परशुरामाच्या भूमीत नामर्द जन्माला आलेले नाहीत, असे बजावतानाच जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प जबरदस्तीने राबवणा-यांचे दात घशात घाला, असे आवाहन शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जैतापूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत केले. सामान्य जनतेच्या संसाराची राखरांगोळी करणारा जैतापूर प्रकल्प हद्दपार करण्यासाठी शिवसेना सर्व शक्तिनिशी आपल्या पाठीशी उभी आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना दिली.
जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध जाहीर केल्यानंतर शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच जैतापूर येथे जाऊन स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकले. शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, व्यावसायिक तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मीठगव्हाणेच्या विस्तीर्ण पठारावर झालेल्या जाहीर सभेत जैतापूर प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार यांच्यासह रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मुंबईच्या शाखाशाखांतून आलेले शिवसैनिक आजच्या सभेला उपस्थित होते.
जपानमध्ये झालेल्या भूकंप व त्सुनामीनंतर तेथील अणूऊर्जा प्रकल्पामध्ये किरणोत्सर्ग झाला. त्यामुळे मोठी हानी झाली असून, तसेच प्रयोग निसर्गरम्य कोकणातील जैतापूरच्या गावक-यांवर करू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला केले. कोणतीही लाच, लालूच, कंत्राटाची आमिषे यांना बळी न पडता संसाराची राखरांगोळी करणा-या जैतापूर प्रकल्पाला आम्ही विरोध करणारच, असे आश्वासन त्यांनी स्थानिक जनतेकडून घेतले. स्थानिक जनतेनेही दोन्ही हात उंचावून उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. तोच धागा पकडून उद्धव पुढे म्हणाले की, जबरदस्तीने आणि अन्याय, अत्याचार करून प्रकल्प राबवणा-या काँग्रेसवाल्यांना आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मी बजावू इच्छितो. तुमची निशाणी असलेला हात आणि सामान्य माणसाचे हात यातला फरक समजायचा असेल तर इथे या. सरकार उलथवून टाकण्याची ताकद सामान्य माणसाच्या हातात आहे. सामान्य जनतेने हात उगारला तर काँग्रेसवाल्यांचे आहेत तेवढे दात घशात गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
जैतापूर येथील शिवसेनेच्या या सभेसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेशी काळजी घेण्यात आली होती. राजापूरचे आमदार राजन साळवी , परशुराम उपरकर , कोकणातील शिवसेनेचे सर्व आमदार , रामदास कदम, सुभाष देसाई , दत्ताजी नलावडे , मनोहर जोशी आदी नेतेमंडळीही यावेळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment