Thursday, April 21, 2011

जैतापूर पेटले; गोळीबारात एक ठार

राजापूर - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात काल आंदोलनाचा भडका उडाला. शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन छेडून प्रकल्पस्थळी शेकडोंच्या संख्येने घुसखोरी करत दगडफेक केली. त्यामध्ये पोलिस उपअधीक्षकांसह (गृह) पाच पोलिस जखमी झाले. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. संतप्त आंदोलकांनी नाटे येथे पोलिस ठाण्याची इमारत आणि एक व्हॅन जाळली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला. तबरेज अब्दुल्ला सेहकर असे त्याचे नाव आहे. अन्य चौघे गंभीर जखमी झाले. राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह ४५ जणांना पोलिसांनी अटक केली.

माडबन येथे प्रकल्पाच्या कुंपणाची भिंत उभारण्याचे काम सुरू होते. ते बंद पाडण्यासाठी शिवसेनेने सकाळपासून आंदोलन पुकारले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हद्दपार करण्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मिठगवाणे येथील सभेत केली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी प्रकल्प होणारच असल्याचे निक्षून सांगितले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संतप्त झाले. माडबन येथे प्रकल्पाच्या नियोजित स्थळावर कुंपण व इतर बांधकामाची कामे सुरू केल्याने आंदोलक व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने प्रकल्पस्थळी चालून आले. साखरीनाटे येथील लोकही समुद्रमार्गे धानिवरेमार्गे प्रकल्पस्थळी गेले होते. पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्‍चक्री झाली. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे आंदोलक पळाले आणि समुद्रमार्गे होडीतून पुन्हा साखरीनाटेकडे गेले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला चढविला आणि मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात पोलिस उपअधीक्षक (गृह) संजीव मोरे यांच्यासह चार पोलिस जखमी झाले. पोलिसांनी हवेत गोळीबार केला. नाटे परिसरातील संतप्त आंदोलकांनी थेट पोलिस ठाण्यावरच हल्ला केला आणि कार्यालय जाळून टाकले. जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये तेरा जण जखमी झाले. जखमी झालेल्या तबरेज अब्दुला सेहकर (२३) याचा मृत्यू झाला.



रत्नागिरीतही जोरदार उद्रेक
रत्नागिरी - जैतापूरमधील आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकाचा मृतदेह पोलिस जीपमधून गोणपाटात गुंडाळून आणण्यात आल्याने आणि पोलिस मृतदेहावर पाय ठेवून बसल्याचे दिसल्याने रत्नागिरी शहरात उद्रेक झाला. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर जादा पोलिस कुमक मागवून जमावावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले. या सर्व प्रक्रियेमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांना मोठा पाठिंबा दिला. आज दिवसभरात झालेल्या घडामोडींनंतर शिवसेनेने आज (ता. १९) "जिल्हा बंद'ची घोषणा केली आहे.

No comments:

Post a Comment