Thursday, April 21, 2011

जैतापूर अणुप्रकल्प अधिक भक्कम!

जैतापूरच्या अणुप्रकल्पाचा परिसर भूकंपाच्या दृष्टिकोनातून मध्यम तीव्रतेच्या भागामध्ये येत असला, तरी या प्रकल्पाची उभारणी करताना अपेक्षेपेक्षा अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करू शकेल, याचा विचार करण्यात येणार आहे.

मुंबई- जैतापूरच्या अणुप्रकल्पाचा परिसर भूकंपाच्या दृष्टिकोनातून मध्यम तीव्रतेच्या भागामध्ये येत असला, तरी या प्रकल्पाची उभारणी करताना अपेक्षेपेक्षा अधिक तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करू शकेल, याचा विचार करण्यात येणार आहे. जपानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातून मिळणा-या माहितीचाही या प्रकल्पाच्या उभारणी वेळी विचार करण्यात येणार आहे. तसेच अणुप्रकल्पासारख्या मोठय़ा प्रकल्पांची उभारणी करताना नैसर्गिक संकटांच्या अपेक्षेपेक्षा थोडय़ा अधिक तीव्रतेच्या संकटाला तोंड देता येईल, अशा पद्धतीने बांधकाम केलेले असते याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) प्रकल्पाच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती अणुऊर्जा महामंडळाला (एनपीसीआयएल) दिली. त्यामध्ये हा प्रकल्प ‘सिस्मिक झोन-3’मध्ये मोडतो. मात्र प्रकल्पाची उभारणी करताना ‘सिस्मिक झोन-4’प्रमाणे (भूकंपाचा अधिक धोका असणारे क्षेत्र) बांधणी करण्याचा सल्ला दिला आहे. तो सल्ला ग्राह्य मानून, या प्रकल्पाचे बांधकाम अधिक भक्कम करणार असल्याचे ‘एनपीसीआयएल’चे सरव्यवस्थापक (जनसंपर्क) रणजित काकडे यांनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले. हा प्रकल्प असणारे क्षेत्र समुद्र सपाटीपासून 24 मीटर उंचीवर आहे, त्यामुळे सुनामीचाही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार असून, कोणत्याही नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी हा प्रकल्प सक्षम असेल. जपानच्या भूकंप आणि सुनामीच्या संकटाची माहिती घेण्यात येत असून, यातून मिळणा-या माहितीच्या आधारे आवश्यकता भासल्यास सुरक्षेचे अधिक उपाय योजण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
अणुप्रकल्पाची उभारणी करताना भूकंप, अतिवृष्टी, वीज पडणे, चक्रीवादळ, रसायनांचा स्फोट, वीज आणि पाणीकपात यांसारख्या बाह्य आव्हानांचा विचार केलेला असतो. या संकटांच्या तीव्रतेपेक्षा एक एकक अधिक तीव्रतेच्या संकटालाही तोंड देता येईल, असे बांधकाम करण्यात येते, असे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांनी सांगितले. भोजे यांनी कल्पकम येथील अणुप्रकल्पाची उभारणी करताना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भूकंपाचा विचार करताना शंभर वर्षामध्ये झालेल्या भूकंपांची तीव्रता आणि तज्ज्ञांचा सल्ला या बाबी विचारात घेतल्या जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले. जपानमध्ये झालेला भूकंप अभूतपूर्व होता, त्यामुळे अधिक भीषण परिस्थिती ओढवली आहे. मात्र प्रत्यक्ष भूकंप आणि सुनामीमुळे झालेली हानी अधिक असताना, संभाव्य अणुसंकटावरच अधिक चर्चा होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पाणीपुरवठा आणि अवजड उपकरणांमुळे प्रकल्प किना-यांवर
जगातील बहुतेक अणुप्रकल्प समुद्रकिना-यांवर आहेत, त्याकडे नेहमीच लक्ष वेधण्यात येत असते. मात्र अणुप्रकल्पातील वीजनिर्मिती आणि शीतक (कुलंट) म्हणून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक असते. तसेच या प्रकल्पांसाठी परदेशातून उपकरणे आयात करावी लागतात. या उपकरणांचे वजन टनामध्ये असते, त्यामुळे त्यांची रस्त्यांवरून वाहतूक करणे सोयीस्कर ठरत नाही. त्यामुळे बहुतेक प्रकल्प किना-यांवर असतात, असे शिवराम भोजे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment