Thursday, November 25, 2010

कोकण होणार प्रदूषण भूमी

 

 
कोकण होणार प्रदूषण भूमी
 
दिनेश केळुसकर, रत्नागिरी

6 जून

पर्यावरणाने समृद्ध असलेला कोकण येत्या पाच वर्षात होणार्‍या औष्णिक वीज आणि मायनिंग प्रकल्पांमुळे प्रदुषणयुक्त भाग म्हणून ओळखला जाईल.

विकासाच्या नावाखाली भूमिपुत्रांचा विरोध झुगारून, जनसुनावणीतील आक्षेप डावलून खोट्या पर्यावरण अहवालांच्या आधारे मार्गी लावले जाणारे हे प्रकल्प पर्यावरणाच्या र्‍हासाला कारणीभूत ठरणार आहेतच. शिवाय येथील सामाजिक जीवनही यामुळे बिघडणार आहे.


गेली दोन वर्षे मायनिंग, औष्णिक वीज आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या विरोधी आंदोलनांनी कोकण धुमसत आहे. पण सरकारला कशाचीच फिकीर नाही. प्रकल्प मार्गी लावण्यापूर्वी घेतली जाणारी पर्यावरणविषयक जनसुनावणी हासुध्दा केवळ एक सोपस्कार झाला आहे.


शांत स्वच्छ समुद्रकिनारे, विपुल जैवविविधता आणि बागबागायतींनी समृध्द असलेल्या या प्रदेशात एकूण 12 औष्णिक वीज प्रकल्प येऊ घातले आहेत.

याशिवाय गॅसवर चालणारे 6 वीजनिर्मिती प्रकल्प आणि जैतापूर मध्ये एनपीसीआयएलचा 10 हजार मेगावॅटचा अणुउर्जा प्रकल्पही मार्गी लागतो आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या पर्यटन जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे उद्योग असावेत याची यादी निश्चित करावी, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 1998मध्येच प्रदूषण मंडळाला कळवले होते. पण अजूनही ही यादी तयार झालेली नाही.


देशाला विजेची गरज आहे, तर लाखो टन खनिज चीनमध्ये निर्यात केले जात आहे. पण या सगळ्यासाठी कोकणच्या भूमीपुत्राला उध्वस्त व्हायचे नाही.

No comments:

Post a Comment